
मराठी अभ्यास केंद्र
श्वास मराठीचा... ध्यास महाराष्ट्राचा
(नोंदणी क्रमांक- महा/६९४/०९/ठाणे, विश्वस्त संस्था नोंदणी क्रमांक :एफ/१८५०१/ठाणे)
३, यमुना निवास, गोविंद बच्चाजी मार्ग, चरई, ठाणे ४००६०२ दू- २५३४३६१९ marathi@marathivikas.org
===============================================
परिचय
‘मराठी अभ्यास केंद्र’ हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मानाचे स्थान मिळेल असे स्वप्न आपण पाहिले. मराठी माणूस या राज्यातच नव्हे तर जगभर स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल अशी आशा बाळगली. मराठी संस्कृतीचा भविष्यकाळ हा तिच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान असेल असे गर्जत राहिलो. प्रत्यक्षात स्थिती काय आहे ?
लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठी मागे पडत आहे. शिक्षणापासून न्यायालयापर्यंत कुठल्याच क्षेत्रांत मराठीला मानाचे स्थान आपण मिळवून देऊ शकलो नाही. देशविदेशात मराठी माणसांनी उत्कर्ष साधला पण हा उत्कर्ष मराठी समाजाच्या तळाच्या घटकांपर्यंत अजूनही पोचलेला नाही. समृद्धीचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले झालेत, अशांपैकी बहुतेकांना मराठी भाषा, संस्कृतीशी फारसे देणेघेणे राहिलेले नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात मातृभाषा वगैरे जुनाट गोष्टींच्या फंदात न पडता व्यक्तिगत उत्कर्षाकडे लक्ष द्यावे अशी भूमिका राज्यकर्ते, नोकरशहा, अभिजनवर्गापैकी अनेकजण आग्रहाने मांडत आहेत. बहुजनसमाज मात्र प्रगतीच्या संधींचा शोध घ्यायचा की आपली भाषा व समाज यांच्याशी निष्ठा राखायची अशा कात्रीत सापडला आहे. आपली भाषा, समाज य